राष्ट्रवादीकडे संचालकांची संख्या फक्त तीन.
चाकण प्रतिनिधी दि. २८ –
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक बबनराव राक्षे तर उपसभापतीपदी रणजित विठ्ठल गाडे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात झाली आहे.
नव्या संवगडयांना संधी.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते सभापती विजय शिंदे पाटील आणि उपसभापती क्रांती सोमवंशी यांनी पदाचा राजीनामा दिला. मंगळवारी (दि.२८) बाजार समिती, राजगुरूनगर येथे निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी राक्षे आणि उपसभापती पदासाठी गाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या निवडणुकीच्या प्रसंगी नवनिर्वाचित सभापती अशोक राक्षे व उपसभापती रणजित गाडे पाटील तसेच मावळते सभापती विजय शिंदे पाटील व उपसभापती क्रांती सोमवंशी, संचालक विठ्ठल वनघरे, माणिक गोरे, जयसिंग भोगाडे, सागर मुऱ्हे, सोमनाथ मुंगसे, सयाजी मोहिते पाटील, हनुमंत कड, अनुराग जैद, महेंद्र गोरे, सुधीर भोमाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी आमदार मोहितेंना धक्का
२०२३ च्या बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १० संचालक निवडून आले होते. सर्वपक्षीय पॅनलचे ७ संचालक होते. राष्ट्रवादीचे निवडून आलेले अशोक राक्षे, सयाजी मोहिते पाटील आणि अपक्ष म्हणून निवडून आलेले महेंद्र गोरे यांनी सर्वपक्षीय पॅनलला पाठिंबा दिला होता. तेव्हा सभापती पदाची माळ ही विजय सिंह शिंदे यांच्या गळ्यात पडली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर जयसिंग भोगाडे आणि विठ्ठल वनघरे हे सर्वपक्षीय पॅनलमध्ये सामील झाले. आज झालेल्या निवडणुकीत रणजित गाडे आणि कमल कड यांनी माजी आमदार मोहिते यांना धक्का देत सर्वपक्षीय पॅनलला पाठिंबा दिला. आणि रणजित गाडे यांनी उपसभापती पदाची माळ गळ्यात घालून घेतली. त्यामुळे बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे फक्त तीनच संचालक उरले आहेत.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
