#AmadarKale×Mohite : ‘चौकशीला सामोरे जा’ म्हणत माजी आमदार मोहितेंना दिले थेट आव्हान!

आजी-माजी आमदारांमध्ये वार प्रतिवार.

चाकण दि. ७ – खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गेल्या महिन्यात पाठवलेले आपले मूळ पत्र आज स्वतः माध्यमांसमोर जाहीर केले. या पत्रावरून खेड तालुक्यातील राजकीय आणि चाकण एमआयडीसी औद्योगिक वर्तुळात मोठी खळबळ उडालेली असताना, आमदार बाबाजी काळे यांनी माध्यमांशी संवाद साधत पत्रातील सर्व आरोप पूर्णपणे सत्य आणि खरी ‘वस्तुस्थिती’ असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच, या प्रकरणावरून माजी आमदार दिलीप मोहिते यांनी चाकण (ता.खेड) येथे ६ जून २०२६ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना, आमदार बाबाजी काळेंनी त्यांना “या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीला कायदेशीरपणे सामोरे जा” असे थेट आव्हान दिले आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दि.६ जून २०२६ रोजी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी चाकण येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले त्यात माझ्या नावाचा आणि सिंडिकेटचा उल्लेख माध्यमांसमोर केला. 

विद्यमान आमदारांचे माजी आमदारांवर आरोप.

याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत चाकण एमआयडीसीच्या औद्योगिक शांततेला बाधा आणणारे, ‘टॉपबँड इंडिया’ सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दारात होणारी बेकायदेशीर आंदोलने आणि कंत्राट व्यवसायातून सुरू असलेली खंडणीखोरी यासारखे अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. हे मुद्दे राज्याच्या औद्योगिक प्रतिमेशी आणि लाखो कामगारांच्या रोजगाराशी संबंधित असल्याने शासनाने याची तातडीने व गंभीर दखल घेतली पाहिजे, असे मुद्दे या पत्रात स्पष्टपणे नमूद असल्याचे सांगितले.

‘…जेलमध्ये जाणार’, काळेचा थेट इशारा.

आमदार बाबाजी काळे औद्योगिक क्षेत्रातील अशांतता याबाबत घेतलेली आक्रमक भूमिका घेत स्पष्ट करत सांगितले की, चाकण औद्योगिक क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना कशा प्रकारे धमकावले जात आहे. आणि यात स्थानिक माजी आमदार यांचे बगलबच्चे सिंडिकेटचे कसे संगनमत आहे. या सर्व बाबी पूर्णपणे सत्य आहेत. औद्योगिक क्षेत्रातील शांतता आणि राज्याची परकीय गुंतवणुकीची प्रतिमा टिकवण्यासाठी शासनाने या तक्रारीची दखल घेऊन दोषींवर तातडीने गुन्हा नोंदवणे. या गुन्हेगारी सिंडिकेटची उच्चस्तरीय चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच आमदार काळे यांनी माजी आमदार दिलीप मोहितेंना आव्हान दिले आहे की, जर तुम्ही निष्पाप असाल तर या शासकीय आणि न्यायालयीन चौकशीला घाबरू नये आणि यास थेट सामोरे जावे. तुमचे सर्व धंदे असेच यापुढे तालुक्याच्या जनतेला आम्ही पुराव्यासह दाखविणार आहोत. त्यामुळे लवकरच तुम्ही जेलमध्ये जाणार आहेत. याबाबत यापुर्वी मी पत्र दिलेली असून विधानसभेत देखील मी प्रश्न उपस्थित केला आहे. याचा पाठपुरावा देखील मी करणार आहे, असे आमदार काळे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment