चाकण प्रतिनिधी दि. २५ –
महाराष्ट्र शासन, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबई येथे बुधवारी (दि.२४) महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, कॅन्टीन यांना महत्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर काही मार्गदर्शक सूचना ही करण्यात आल्या आहेत. नियमांचे व सुचनांचे पालन न केल्यास दंडात्मक व कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एफडीए कडून देण्यात आला आहे.

★हे नियम का काढण्यात आले?
★राज्यभर तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यामुळे.
★अस्वच्छ, कीटकग्रस्त स्वयंपाकघर आढळल्यामुळे.
★वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर आढळल्यामुळे.
★वैद्यकीय तपासणी नसलेले कर्मचारी आढळल्यामुळे.
★चुकीचं पॅकेजिंग व तापमानातील त्रुटी आढळल्यामुळे.
★बॉटलबंद पाण्यासाठी ग्राहकांवर केलेली सक्ती आढळल्यामुळे.
★हे नियम कोणाला लागू होणार?
हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, कॅन्टीन, कॅफेटेरिया, बेकरी व मिठाई दुकाने, केटरिंग फूड कोर्ट, ज्यूस बार, क्लाऊड/डार्क/सेंट्रल किचन, साखळी ब्रँड्स, ऑनलाइन फूड अँप्स.
★मोफत स्वच्छ व सुरक्षित पाणी.
एफडीए च्या नवीन नियमानुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे येथे ग्राहकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी देणे बंधनकारक असणार आहे. मालक व चालक हे कोणत्याही ग्राहकाला बाटलीबंद पाणी विकत घेण्यास भाग पाडता येणार नाही. ग्राहकाने मागणी केल्यावरच देण्यात यावे. प्रत्येक आस्थापनात फलक बंधनकारकः “सुरक्षित पिण्याचे पाणी येथे विनामूल्य उपलब्ध आहे.” आरओ/यूव्ही द्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करावी. दर ६ महिन्यांनी आरओची तपासणी करणे बंधनकारक असेल.
★निरोगी व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग.
आचारी, वेटर तसेच अन्न हाताळणाऱ्या व्यक्तीची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. दर २५ कर्मचाऱ्यांमागे एक प्रशिक्षित अन्न सुरक्षा पर्यवेक्षक असणे गरजेचे आहे. प्रत्येक पुरुष व महिला कर्मचाऱ्यास स्वच्छ गणवेश, टोपी, हातमोजे असणे बंधनकारक आहे. महिलांना दागिने, नेलपॉलिश वापरण्यास बंदी असेल. अन्न बनवणाऱ्या परिसरात धूम्रपानास बंदी तसेच थुंकण्यास सक्त मनाई असेल.
★FSSAI परवाना बंधनकारक.
FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण) यांच्या परवान्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही. वैध एफएसएसएआय परवाना असणे व नोंदणी असणे अनिवार्य आहे. तसेच दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. जर परवान्याशिवाय व्यवसाय करत असाल तर कलम ६३ नुसार गुन्हा नोंद होऊ शकतो. हॉटेल्समध्ये स्वच्छतेसाठी अनुसूची ४ चे काटेकोर पालन करणे आवश्यक असेल.
★वर्तमानपत्रात अन्नपदार्थ देण्यास बंदी.
वडापाव, इडली-डोसा, दाबेली, पाणीपुरी विक्रेता तसेच इतर छोटे व्यावसायिकांना वर्तमानपत्रात अन्नपदार्थ देण्यास बंदी असेल. कारण छापील कागद किंवा वर्तमानपत्रातील शाई, शिसे व जड धातू हे गरम व तेलकट अन्नात मिसळतात. ते आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. तेव्हा यापुढे अन्नपदार्थ हे फक्त अन्न-दर्जाचं (फूड-ग्रेड) पॅकेजिंग, बटर पेपर, पार्चमेंट, प्रमाणित गुंडाळणी कागद व सुरक्षित कंटेनर यामध्येच द्यावे.
★योग्य तापमान, रंग संकेतीत फळ्यांचा वापर.
वेगवेगळे अन्नपदार्थ हे विशिष्ट तापमानालाच शिजवावे. गरम अन्न हे ≥ ६०°C, थंड अन्न हे ≤ ५ °C, गोठवलेलं अन्न हे ≤ -१८°C, तसेच मांस/चिकन/मासे हे अन्न पदार्थ ≥ ७५°C पर्यंत शिजवावेत.
कापण्याच्या फळ्या (रंगसंकेत): लाल – कच्चे मांस, निळा – मासे, पिवळा – चिकन, हिरवा – भाज्या/फळं., पांढरा – शिजलेलं अन्न ह्या रंगाच्या फळ्यांचा वापर करावा. तसेच कच्चे व शिजलेले अन्न पदार्थ हे FIFO तत्त्वानुसार वेगवेगळे ठेवावेत.
★तेलाच्या पुनर्वापरावर बंदी.
आरोग्याच्या दृष्टीने असलेली अतिशय बाब म्हणजे वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर बंद करणे. तेलाचा TPC (टोटल पोलर कंपाउंड्स) हा २५% पेक्षा जास्त असेल, तर ते तेल असुरक्षित व आरोग्यास हानिकारक असते. तेव्हा लगेच काढून टाकावे. ते तेल पुन्हा गरम अथवा नवीन तेलात मिसळू नये. तेलाची दर ८ तासांनी TPC मीटरने तपासणी करणे आवश्यक आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) सुरु केलेल्या RUCO उपक्रमाअंतर्गत सुरु केलेल्या अधिकृत संस्थेकडे वापरलेले तेल बायोडिझेल करण्यास द्यावे. वापरलेले तेल हे नाल्यात किंवा उघड्यावर टाकणे हा गुन्हा आहे.
★क्लाऊड किचन व ऑनलाइन अन्नावर विशेष लक्ष.
क्लाऊड किचन व ऑनलाईन अन्नपदार्थ विकणाऱ्या प्रत्येक किचनला स्वतंत्र परवाना असणे बंधनकारक आहे. १४-अंकी परवाना क्रमांक गरजेचा आहे. हा परवाना क्रमांक हा सर्व ब्रँडच्या पॅकेजिंग, बिल व मेनूवर असणे गरजेचे आहे. डिलिव्हरी फक्त FoSTaC यांनी ठरवलेल्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून करावी. अन्न पदार्थाचे तापमान हे नियंत्रित व सीलबंद (tamper-evident) असावे. अन्नपदार्थाच्या डिलिव्हरीवेळी किमान ३०% किंवा ४५ दिवस शेल्फ-लाईफ शिल्लक असावी.
★मेनूवर पारदर्शक माहिती असणे आवश्यक.
मोठ्या साखळी व १० पेक्षा जास्त शाखा असणाऱ्यांच्या आस्थापनांनी कॅलरी व अॅलर्जन माहिती दाखवणं बंधनकारक असेल. शाकाहारी अन्नपदार्थासाठी हिरव्या आणि मांसाहारी अन्नपदार्थासाठी तपकिरी रंगाचे चिन्ह दाखवण्यात यावे. हॉटेलमध्ये जे अन्नपदार्थ देता ऑनलाइनही तीच माहिती असावी. ग्राहकांना खोटे आणि दिशाभूल करणारे दावे नसावेत.
★तक्रार कुठे करावी?
जर ग्राहकांना हॉटेल्स, रेस्टॉरंट व ढाबे याठिकाणी काही त्रुटी अथवा चुकीचं आढळळून आले तर खालील नंबरवर तक्रार करावी.
अन्न व औषध प्रशासन:टोल-फ्री-१८०० २२२ ३६५
FSSAI हेल्पलाईन क्र.:१८०० ११४ ०००
FOSCOS : मोबाईल अँप
जवळील विभागीय अन्न व औषध प्रशासन कार्यालय.
★नियमभंग करणाऱ्यास कठोर व दंडात्मक कारवाई.
~असुरक्षित अन्नामुळे मृत्यू झाला तर ७ वर्ष ते जन्मठेपाची शिक्षा आणि ₹१० लाखांवर दंड. ~परवान्याशिवाय व्यवसाय व दिशाभूल जाहिरात करणाऱ्यास ₹१० लाखांपर्यंत दंड. ~अवमानक (substandard) अन्नपदार्थ विकणाऱ्यास ₹५ लाख दंड. ~अस्वच्छ प्रक्रिया करून अन्नपदार्थ विकणाऱ्यास ₹१ लाख दंड. ~पुनरावृत्ती करणाऱ्यास दुप्पट दंड आणि परवान्याचे निलंबन किंवा रद्द केला जाऊ शकतो.
