नसरापूर नंतर चाकण परिसरात घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट.
चाकण दि.२ – चाकण औद्योगिक वसाहतीतील खालुंब्रे (ता.खेड) येथे तीन वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून आरोपीला अवघ्या बारा तासात बेड्या ठोकण्यात यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रियान्सू कमलेश रावत (वय ३ वर्षे) हा आईसह खालुंब्रे येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. फिर्यादी सीमा कमलेश रावत (वय ३० वर्षे, सध्या राहणार खालुंब्रे, ता.खेड जि.पुणे. मुळगाव लालगाव, मोहरिया ता.सिरमल, जि.रिवा, मध्यप्रदेश) यांना शुक्रवारी (दि.१ मे) मिळून येत नव्हता. शोध घेतला असता मयत बालक हा शेजारील आरोपी सत्यम कुमार (रा. बिहार, पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्या भाड्याच्या खोलीत मृत अवस्थेत आढळून आला. आरोपीने बालकावर लैंगिक अत्याचार करून गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला होता. आरोपी हा विधी संघर्षग्रस्त बालक आहे.
आरोपी हा खून करून बिहारमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सीसीटीव्ही दृश्य, तांत्रिक आणि गोपनीय माहितीनुसार आरोपीचा शोध घेऊन पुणे रेल्वे स्टेशन परिसर येथे शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. भारतीय न्याय संहिताचे कलम १०३(१), २३८ आणि पोक्सो कायदा कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले.
सदरची कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त महाळुंगे विभाग सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस उपनिरीक्षक पिंजारी, पोलिस अंमलदार विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, चेतन सावंत, गोरख गाडीलकर, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हनुमंते, योगेश तिडके, प्रशांत कसबे व शिवाजी मरकड यांनी केली.

पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या दोन घटना घडल्याने खळबळ.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षीय बालिकेवर ६५ वर्षीय आरोपीकडून लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून करण्यात आला. आरोपी हा विविध गुन्ह्यांतर्गत या अगोदर तुरुंगावास भोगल्याची माहिती समोर आली आहे. तर खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील खालुंब्रे गावात दुसरी घटना घडली. तीन वर्षीय बालकावर विधी संघर्षग्रस्त बालकाकडून लैंगिक अत्याचार करून धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. भाड्याने राहत असलेल्या खोलीत मृतदेह सुटकेसमध्ये लपवून महाराष्ट्रातून पोबारा करण्याअगोदर पोलिसांकडून अटक करण्यात आली. एकाच दिवशी ह्या दोन घटना घडल्याने पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घडलेल्या दोन घटनांमूळे समाजात कायद्याचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



