रस्त्यांसाठी १०० कोटींची तरतूद. CHAKAN
चाकण प्रतिनिधी दि.१२ –
चाकणसह एमआयडीसीतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) चार नवीन बायपास उभारण्यात येणार आहेत. या नवीन बायपासमुळे चाकणमधील वाहतूककोंडीचा भार कमी होण्यास मदत मिळेल. पुणे-नाशिक, तळेगाव चाकण शिक्रापूर या दोन महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित चार बाह्यवळण मार्ग (बायपास) बनविण्यात येणार आहे. भूसंपादन प्रक्रियेला युद्धपातळीवर गती देण्यात आली. चाकण औद्योगिक वसाहतीचा वाढलेला विस्तार पाहता वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामध्ये दुचाकी, रिक्षा, चारचाकी, बस, ट्रक, जड-अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. मुख्य महामार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित चार नवीन बाह्य वळण मार्ग बनविण्यात येणार आहेत. CHAKAN

प्रस्तावित चार नवीन बाह्यवळण मार्ग.
१) हिंगणे चौक (सारा सिटी चौक) ते फॉक्सवॅगन मार्ग, खराबवाडी
तळेगाव-चाकण महामार्गावरील हिंगणे चौक (सारा सिटी चौक) ते फोक्सवॅगन मार्गाला जोडणारा हा मार्ग ९०० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद असेल. या मार्गामुळे औद्योगिक क्षेत्रातील टप्पा दोन आणि तीनमधील अवजड वाहतूक थेट पुणे-नाशिक महामार्गाकडे वळविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तळेगाव चौक आणि चाकण परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत मिळेल. CHAKAN
२) सॅनी कंपनी ते समृद्धी सीएनजी पंप.
नाणेकरवाडी परिसरातील सॅनी कंपनी ते समृद्धी सीएनजी पंप असा १.२ किलोमीटर लांबीचा आणि १५ मीटर रुंदीचा मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गामुळे तळेगाव तसेच औद्योगिक क्षेत्रातील टप्पा दोन आणि तीनला पुणे-नाशिक महामार्गाशी थेट जोडला जाणार आहे. त्यामुळे चाकणच्या मुख्य चौकावरील वाहतूककोंडी मदत होईल. CHAKAN
३) मेदनकरवाडी बंगला वस्ती चौक ते रासे फाटा.
मेदनकरवाडीमार्गे असा २.५ किलोमीटर लांबीचा आणि ३५ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. पुणे-नाशिक महामार्गावरून थेट रासे फाटा येथील चाकण-शिक्रापूर मार्गाशी जोडला जाणार आहे. CHAKAN
४) पश्चिम बाह्यवळण मार्ग.
पुणे-नाशिक महामार्गाला चाकण एमआयडीसीच्या पाचव्या टप्प्याशी जोडण्यासाठी ८५० मीटर लांबीचा आणि ४५ मीटर रुंदीचा प्रशस्त मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गामुळे आंबेठाण चौक आणि चाकण चौकातील अवजड वाहनांची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. CHAKAN
अंतर्गत रस्त्यांसाठीही १०० कोटी.
चाकण आणि तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील अंतर्गत वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी पीएमआरडीएने प्रमुख जिल्हा मार्गाच्या विकासाचे कामही हाती घेतले आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. अनेक कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. यामध्ये चिखली-मोई (१.६५ किमी), कुरुळी फाटा-निघोजे (२.५ किमी), आळंदी फाटा (चाकण)-आळंदी रस्ता (४ किमी), चहोली खुर्द-आळंदी-मरकळ (२ किमी), निघोजे-चाकण एमआयडीसी (१.२५ किमी) आणि खालुंब्रे-चाकण एमआयडीसी टप्पा दोन (१.७५ किमी) या प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. CHAKAN
प्रस्तावित चार बाह्यवळण मार्गांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आमचे नियोजन असून, त्यानंतर औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीचा प्रश्न बहुतांशी निकाली निघेल.
शिवकुमार कुबल, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए
हे ही वाचा. नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या पंधरा दिवसांत. https://sahyadridigital.in/Tender-for-Nashik-Phata-to-Rajgurunagar-elevated-corridor-to-be-floated-in-next-15-days

