चार हजार कामगारांच्या स्वप्नांचा चुराडा. CHAKANMIDC
चाकण प्रतिनिधी दि.११ –
चाकण एमआयडीसी ही देशातील सर्वात मोठे ऑटोमोबाइल हब असल्याचा तोरा मिरवणाऱ्यांचा भ्रमाचा फुगा फुटला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि त्यास निम्मित ठरले आहे, चाकण औद्योगिक क्षेत्रातील एकूण २० लघुउद्योग कंपन्या खंडाळा एमआयडीसी, (जि.सातारा) येथे स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. जर कंपन्या स्थलांतरित झाल्या तर तब्बल ४ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळून स्वप्नांचा चुराडा होतानाचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील कामगारांमध्ये चिंतेचे तसेच भीतीचे ढग निर्माण झाले आहेत. CHAKANMIDC
स्थलांतराची वेळ कशामुळे ?
चाकण एमआयडीसीतील लोक उद्योगांना होणारा अनियमित वीजपुरवठा व पाणीपुरवठा, कचऱ्याची समस्या, सांडपाण्याची अव्यवस्था, कामगारांची असुरक्षितता, मुख्य व अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली दयनीय अवस्था यामुळे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. त्याचबरोबर सध्या चाकण एमआयडीसीला भेडसावणार सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाहतूककोंडी. सततच्या होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे कामगार वर्ग वेळेवर कंपनीत पोहोचत नाही. त्यामुळे निश्चित उत्पादनापेक्षा कमी उत्पादन साध्य होते. तसेच कच्चा माल आणि बनवलेला पक्का माल वाहतूककोंडीमुळे कंपन्यांमध्ये वेळेवर पोहोचत किंवा पोहोचवता येत नाही. त्यामुळे कंपन्यांना अधिकचा आर्थिक फटका सहन करावा लागतो. अशा भौतिक व पायाभूत सुविधा मिळत नसल्याने कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा मार्ग निवडला आहे. CHAKANMIDC

सरकार व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष.
चाकण एमआयडीसीतून सरकारला लाखो रुपयांचा कररुपी पैसा दिला जातो. पण त्यांच्याकडून भौतिक व पायाभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे, अशी भावना कंपनी मालकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून आमच्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली सुद्धा जात नाही, असाही आरोप करण्यात येत आहे. CHAKANMIDC
हजार कोटींची वार्षिक उलाढाल.
चाकण एमआयडीसीतील लघु उद्योग क्षेत्रातील एकूण २९ कंपन्यांची सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीत स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयडीसी विभागातील अधिकाऱ्यांशी कंपनी मालकांची सविस्तर बोलणी सुरु आहे. त्यापैकी २० मालकांना कंपनीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती कंपनीच्या अधिकारी यांनी दिली आहे. स्थलांतरित होणाऱ्या कंपनीची एकत्रित वार्षिक उलाढाल तब्बल ही अंदाजे १ हजार कोटींच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा फटका चाकण एमआयडीसीला बसणार आहे. CHAKANMIDC
कामगारांच्या नोकरीवर गदा.
चाकण एमआयडीसीतील लघुउद्योग कंपन्यानी स्थलांतर केल्यास तब्बल दोन हजार प्रत्यक्ष कामगार व दोन हजार अप्रत्यक्षरित्या कंपन्यांवर अवलंबून असणाऱ्यांवर बेरोजगारांची गदा येणार आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्र व कामगारांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा क्षणात चुराडा होणार आहे. CHAKANMIDC

वीस कंपन्या स्थलांतरित होणार!
चाकण एमआयडीसीतील दिक्षा एक्सपोर्ट प्रा.लि., विनय इंजीनियरिंग, ग्रो स्टार इलेक्ट्रोप्लेटिंग सोल्युशन, ग्रो मेटाकेम, कोझी कॉर्नर, एरोमेक इंजीनियरिंग, प्रोरस्ट कंपनी, नंदादीप एंटरप्राइजेस, डिगअर्थ कंट्रक्शन इक्विपमेंट्स इंडिया प्रा.लि., प्लेटमास्टर्स कंपनी, अविरत इंटरप्राईजेस, श्री विनायक इलेक्ट्रोपेटर्स प्रा. लि., श्रीनाथ इंजिनियर्स प्रतिबिंब प्लेक्स पॅक प्रा.लि., जे एस इंजीनियरिंग सोल्युशन, साई मेटाकेम, उत्कर्ष इंजिनियर्स, निर्मिती इंजिनियर्स, पी टी टेक्नॉलॉजीस, पियुष इंटरप्राईजेस, किरण इन ट्रेड कॉर्पोरेशन, अधिक रिसॉर्ट इंडिया प्रा लि, आशीर्वाद मेटालाइफ कोटिंग प्रा.लि, श्री इंजीनियरिंग वर्क्स, इलेक्ट्रो डीप कंपनी, कांथिक फ्लेक्सो ग्राफिक्स, इंटिग्रेटेड सोल्युशन, मॅट्रिक फास्ट टूल्स टेक्नॉलॉजी व डॉट पॅकटेक इंडस्ट्रीज अशा २९ लघुउद्योग क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्यापैकी २० कंपन्या ह्या स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. CHAKANMIDC
परदेशी कंपनी ग्राहकांपुढे कचऱ्याच्या समस्येमुळे लाजेने मान खाली घालावी लागते. चाकण एमआयडीसीतून इच्छा नसतानाही कंपनी स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे. कारण भौतिक व पायाभूत सुविधांची कमतरता आणि कामगारांची सुरक्षितता याकडे प्रशासन पूर्णपणे कानाडोळा करत आहे.
– शंतनू कुलकर्णी, डायरेक्टर, मॅट्रिक्स टूलिंग्ज.
चाकण एमआयडीसीमध्ये समस्यांचे ढीग नसून डोंगर उभे आहेत. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासन, सरकार आणि राजकारणी व्यक्ती याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.
– धनंजय शेडबाळे, डायरेक्टर, दिक्षा एक्सपोर्ट.

