दंडात्मक कारवाईतून लाखो रुपये कर जमा.
चाकण दि. ४ – चाकण एमआयडीसीत कंपन्यामध्ये हजारोंच्या संख्येने बस, ट्रक आणि जड-अवजड वाहने येत असतात. तेव्हा वाहनचालक तळेगाव-चाकण महामार्ग, महाळुंगे तळवडे मार्ग, स्कोडा-फॉक्सवॅगन मार्ग तसेच एमआयडीसीतील इतर अंतर्गत मार्गांवर वाहने पार्क करत असतात. रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून वाहतूकीस अडथळा निर्माण करतात. पूर्वसूचना देऊन ही वाहनचालक वाहने रस्त्याच्या कडेने वाहने पार्क करतात.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत असणाऱ्या महाळुंगे वाहतूक पोलिस विभागाच्या हद्दीमध्ये बेशिस्तपणे वाहने पार्क करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. महाळुंगे वाहतूक पोलिस विभागामार्फत मागील पाच महिन्यात नो पार्किंग मध्ये उभी असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांकडून केलेली दंडात्मक कारवाई –
माहे जानेवारी २०२६ ते मे २०२६ पर्यंत १ हजार ११७ रस्त्याच्या कडेने उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करून एकूण १४ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कारवाई करताना वाहनचालकांना आधी स्पिकरवर वाहन तिथुन काढण्याची सुचना केली गेली. त्यानंतर वाहन न काढणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर जानेवारी २०२६ ते मे २०२६ पर्यंत २०३७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण १४ लाख २१ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्याचबरोबर बुलेट सायलेन्सर, नो पार्किंग आणि काळी फिल्म अशा वाहनांवर महाळुंगे वाहतूक विभागामार्फत धडक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई महाळुंगे वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड, सहा. पोलीस उपनिरीक्षक नामदेव वाघमोडे, गणेश भिसे, पोलिस कर्मचारी विश्वनाथ जाधव, मयूर तीवाटणे, दिलीप काटे, अक्षय लोखंडे, अमोल रावते, परमेश्वर केंद्रे व अंकुश राठोड यांच्या उपस्थितीत करण्यात आली.