चाकण एमआयडीसीत अवैध गॅस वितरकाच्या दुकानावर धाड.

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई.

चाकण दि.२ –  पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने खराबवाडी (ता.खेड) येथील ‘जय गणेश भारत गॅस’ या वितरकाच्या दुकानावर धाड टाकली. या कारवाईत गॅसची अवैध साठवणूक आणि काळाबाजार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गॅस टाक्या जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी या कारवाईत एकूण ८१ गॅस टाक्या जप्त केल्या आहेत. यामध्ये काही टाक्या पूर्णपणे भरलेल्या, तर काही अर्धवट भरलेल्या आढळून आल्या. अंदाजे ३०० ते ४०० किलो गॅसचा साठा जप्त करण्यात आला.

पोलिसांनी या प्रकरणी सचिन प्रभाकर म्हसकरे आणि कुणाल संतोष हजारे अशा दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

ही धडक कारवाई पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवाडकर, पांडुरंग देवकाते, पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे तसेच अंमलदार गणेश सावंत, गणेश कोकणे, विनोद वीर, विशाल गायकवाड, अमर कदम आणि नितीन लोखंडे यांनी केली.

अवैध गॅस वितरकांचे धाबे दणाणले.

चाकण एमआयडीसीतील अवैध गॅस वितरकावर केलेली कारवाई मोठी असल्याने इतर अवैध गॅस वितरकांचे धाबे दणाणले आहेत. आखाती देशातील युद्धामुळे गॅसटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातून अजून ही गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही. तर त्यात अवैध गॅस वितरकाकडे ८१ गॅस टाक्या सापडल्या जातात. ही गोष्ट सुरक्षेच्या दृष्टीने खूप गंभीर बाब आहे. चाकण परिसरात राजरोस आणि सर्रासपणे अवैध गॅस विक्री होत आहे. अव्वाच्या सव्वा भावात गॅस विकला जात आहे.

Leave a Comment