#Lohgadmurder : भावी बायकोनेच गडावरून ढकलून केला तरुणाचा खून.

लोहगड अपघात प्रकरणाचे हायप्रोफाईल मर्डर मिस्ट्रीत रूपांतरित.

चाकण प्रतिनिधी दि. २३ –

लोणावळ्याजवळील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लोहगडावरून पडून मयत केतन विशाल अग्रवाल (वय २५ वर्षे) याचा मृत्यू झाल्याची घटना हि दि.२० जून रोजी घडली होती. होणाऱ्या भावी पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. तेव्हा मोबाईलमध्ये सेल्फी घेत असताना पाय घसरून तोल जाऊन ३५० फूट खोल दरीत पडून झालेला अपघात म्हणून या प्रकरणाची पोलिस दफ्तरी नोंद करण्यात आली होती. परंतु लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तांत्रिक आणि परिस्थितीजन्य तपासानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. होणारी भावी पत्नी सिया गोयल हिनेच आपला मित्र व प्रियकर चेतन चौधरी ह्याच्या मदतीने हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. तेव्हा हा केवळ अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून खून केल्याचे तपासाअंती उघड झाले आहे.

खून करण्याचे कारण आले समोर.

केतन आणि सियाचे लग्न हे कौटुंबिक संबंधातून ठरविण्यात आले होते. पण सियाला हे लग्न मान्य नसल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे हे लग्न होऊ नये म्हणून मित्राच्या साह्याने अपघाताचा बनाव करून गडावरून खोल दरीत केतनाला ढकलून देऊन खून करण्यात आला.

पोलीसांच्या योग्य तपासामुळे खुनाची उकल.

पुढील अधिकचा तपास करताना पोलिसांकडून गडावरील सुरक्षा कॅमेऱ्यांचे चित्रण तपासण्यात आले. तेव्हा एक संशयात्मक गोष्ट दिसून आली. जून महिन्यातही कडक उन्ह पडले असून ही डोक्याला टोपी असलेला जाड उबदार टी-शर्ट (हुडी) घालून फिरणारा तरुण आढळून आला. तो केतन आणि सिया यांचा पाठलाग करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्या दृष्टीने अधिक तपास केला असता, तो तरुण सियाचा मित्र व प्रियकर चेतन चौधरी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत हा अपघात नसून खून असल्याचे उघडकीस आले. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी माहिती दिली.

केतन व सियाची पार्श्वभूमी.

केतन अग्रवाल हा प्रसिद्ध उद्योगपती विशाल अग्रवाल यांचा एकलूता एक मुलगा होता. तर सिया गोयल ही पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील प्रसिद्ध व्यावसायिक प्रविण बसेसर गोयल यांची मुलगी आहे.

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांचे गंभीर आरोप.

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिया गोयलवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हटले की, सिया गोयल हीचे आधीपासूनच अनैतिक संबंध होते. तिने आमच्या साध्या-भोळ्या मुलाशी लग्नाचा बनाव केला. तिच्या चारित्र्याबद्दल आणि भूतकाळातील वर्तनाबद्दल तिच्या कुटुंबाला पूर्ण माहिती होती. तरीही त्यांनी सत्य लपवले व आमची फसवणूक केली आहे. केतनच्या वडिलांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे की, आरोपींनी लोहगडावर यश न मिळाल्यास महाबळेश्वरला नेऊन केतनचा खून करण्याचा प्लॅन तयार केला होता.

शाही विवाह सोहळ्याची होती चर्चा.

 मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये केतन व सियाचे लग्न होते. दोन्ही परिवारांकडून लग्नाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती. लग्नासाठी जयपूर, राजस्थान येथे १७ कोटी रुपये खर्चून एक आलिशान महाल बुक केला होता. तसेच लग्नास्थळी जाण्यासाठी दोन खाजगी विमानांचे बुकिंगदेखील करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर या शाही विवाह सोहळ्याची चांगली चर्चा रंगली होती. 

 

Leave a Comment