JusticeforChild : चिमकुलीच्या न्यायासाठी रान उठवलंय, मग चिमुकल्याचा दोष काय?

 

चाकण दि.४ – महाराष्ट्र दिनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर आणि खेड तालुक्यातील खालूंब्रे (चाकण) येथे तीन वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. चिमकुलीवर अत्याचार करणारा ६५ वर्षीय आरोपी आणि चिमुकल्यावर अत्याचार करणारा १६ ते १७ वर्षीय अल्पवयीन आरोपी आहेत. या दोन घटना म्हणजे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि चीड आणणाऱ्या आहेत.

चिमकुलीला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रभर रान उठवलंय. रास्ता रोको, आंदोलने, निषेध मोर्चे, आरोपीची गाडी अडवणे अशा गोष्टी केल्या गेल्या. आणि हे सर्व करणे साहजिकच आहे. कारण हे कृत्य म्हणजे अमानवीय, संतापजनक, घृणास्पद आहे. मग त्या चिमुकल्याचा काय दोष आहे? त्या तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या तोंडातून आता कुठेतरी शब्द फुटू लागले होते. तो ही बोबड्या भाषेत बोलत असेल मला ही न्याय मिळवून द्या. त्याच्या कुटूंबाला थोडीशी अपेक्षा असेल की आमच्या बाळालाही न्याय मिळावा.

चिमुकल्याविषयी ना कोणते राजकीय नेते, अभिनेते, प्रसिद्ध व्यक्ती यांनी साधे दुःख सुद्धा व्यक्त करू नये. एवढी शरमेची गोष्ट आहे. त्याला न्याय मिळावा यासाठी कोणीही तोंडातून ब्र शब्द ही काढला जाऊ नये. ह्या दोन्ही घटनांमध्ये फक्त चिमुकलीचे प्रकरण उचलून धरले. कारण आरोपीचे नाव भिमराव कांबळे आहे. तो आरोपी हा एका विशिष्ट जातीचा आहे. अशा संवेदनशील घटनेमध्ये ही जाती-पातीचे राजकारण केले जात आहे. खरोखर ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय खेदजनक बाब आहे. आरोपी हा आरोपीच असतो. आरोपीला ना कोणती जात-पात, ना धर्म असतो. त्यानी केलेल्या कृत्याला कठोरातील कठोर शिक्षा ही मिळालीच पाहिजे.

चिमुकल्याचा काय दोष होता?

चिमुकल्याच्या गुदद्वाराजवळ जखमा आढळून आल्या. जबरदस्ती करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून मृतदेह सुटकेसमध्ये लपवून ठेवला. एवढे अमानुष कृत्य होऊन सुद्धा चिमुकल्याच्या न्यायासाठी कोणीच का एकवटले किंवा पुढे सरसावले गेले नाहीत? का तर तो चिमुकला परराज्यातील परप्रांतीय होता. पण तोही एक निष्पाप जीवच होता ना. समाजात एवढी मानसिकता ढासळली आहे का? जिथे फायद्याची पोळी भाजली जाणार नाही. चमकोगिरी करायला वाव मिळणार नाही. म्हणून जाणूनबुजून तिकडे दुर्लक्ष करायचे. एवढा माणुसकीचा स्तर खालवला गेला आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दोन्ही घटनेनंतर समाजात कायद्याचा धाक उरला नाही आणि तीळभरही माणुसकी उरली नाही. हे मात्र नक्की स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment