कोयता, लोखंडी रॉड तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण.
चाकण दि.८ – “आम्ही बी.टी.कंपनीचे आहोत आणि मरकळ गावात फक्त आमच्याच कंपनीची हवा चालणार आहे. आज तुला कोयत्याने उभा चिरून तुझा खेळ खल्लास करतो,” असे म्हणत आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार केला. ही घटना मरकळ (ता.खेड) येथे घडली आहे. पूर्ववैमन्यासातून तीन तरुणांना सहा आरोपींकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची बाब १ जून रोजी समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर महादेव पाचपुते (रा. मरकळ, ता.खेड जि.पुणे) हा आपले मित्र देवा फुंदे व सोन्या पाचपुते यांच्याबरोबर दुचाकीवरून मरकळ हुन आळंदीकडे खरेदी करण्यासाठी जात होते. तेव्हा आरोपी
१) बजरंग बाळासाहेब टाकळकर,
२) निखिल धर्मराज टाकळकर,
३) विलास तुकाराम टाकळकर,
४) प्रज्वल ज्ञानेश्वर टाकळकर,
५) अभिषेक राजेंद्र लोखंडे,
६) पंकज भाऊसाहेब साळुंखे
(सर्वजण रा. मरकळ, ता. खेड जि. पुणे) यांनी फिर्यादीची दुचाकी कळमजाई वस्ती, मरकळ येथे जबरदस्तीने अडवली. जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींकडून मारहाण करण्यास सुरवात केली. निखिल टाकळकर यांनी पाचपुतेच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केली. विलास टाकळकर यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यामध्ये फिर्यादीचा हात फ्रॅक्चर झाला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला.
तसेच सोन्या पाचपुते व देवा फुंदे यांना प्रज्वल टाकळकर, अभिषेक लोखंडे व पंकज साळुंखे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी निखिल व विलास टाकळकर यांनी काळ्या रंगाची फॉर्च्यूनर गाडी ही फिर्यादी पाचपुते यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावातील नागरिकांनी हस्तक्षेप करून फिर्यादीचे प्राण वाचवले. तदनंतर आरोपी हे फॉर्च्यूनर गाडीत बसून घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर पाचपुते यांना पुढील उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटल, पिंपरी येथे पाठवण्यात आले.

आळंदी पोलीस स्टेशन येथे आरोपींवर विविध गुन्ह्यांतर्गत कलमे लावण्यात आली असून पोलीस अधिकारी व कर्मचारी पुढील अधिकचा तपास करत आहे.