पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, ओतूर पोलीस व स्थानिक ग्रामस्थांची संयुक्त धाडसी कामगिरी.
चाकण प्रतिनिधी दि. १३ –
जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीची योजना हाणून पाडली आहे. टोळीतील ६ सराईत आरोपींना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक करून मोठे यश संपादन केले आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस, बोलेरो जीप आणि इतर घातक हत्यारांसह एकूण १४ लाख ८७ हजार ८२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या अटकेमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील तब्बल २० गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. Punegraminpolice
आरोपींचा शोध कसा लागला?
लोणी प्रवरा (जि. अहिल्यानगर) येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप (क्र. एमएच १७ एजे ३०७५) ही दि. १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कोळवाडी (ता. जुन्नर) येथे संशयास्पद स्थितीत दिसून आली. वाहन मालकाचे नातेवाईक विघ्नेश सुभाष घोलप हे या गाडीचा शोध घेत असताना त्यांनी गाडीतील संशयितांकडे चौकशी केली असता त्यांच्यात वाद झाला. संशय बळावल्याने विघ्नेश यांनी “चोर-चोर” असा आरडाओरडा केला. घटनेचे गांभीर्य ओळखून कोळवाडीतील स्थानिक नागरिक तातडीने गोळा झाले. नागरिक आणि आरोपींमध्ये जोरदार झटापट झाली. ज्यामध्ये गावकऱ्यांनी दोन आरोपींना पकडून ठेवले. मात्र गर्दीचा फायदा घेऊन इतर चार आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. Punegraminpolice

६ तासाच्या शोधकार्यानंतर आरोपी अटक.
सदर घटनेची माहिती ओतूर पोलीस यांना कळविण्यात आली. आरोपी हे आलमे गावाच्या दुर्गम डोंगर-दरीच्या परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची पथक, ओतूर पोलीस यांनी स्थानिक ग्रामस्थ व पोलीस पाटील यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला. तब्बल ६ तास राबवलेल्या थरारक शोधमोहीमेनंतर पळून गेलेल्या इतर चारही आरोपींना शोधून काढले. Punegraminpolice
अटक करण्यात आलेले सराईत आरोपी
सोनूसिंग कापूरसिंग टाक (वय ३०, रा. हडपसर, पुणे), जिलूसिंग शेरसिंग दुधानी (वय ४०, रा. खोपोली, जि. रायगड), करणसिंग गगनसिंग टाक (वय २७, रा. परभणी), पंकजसिंग काळुसिंग शिकलगार उर्फ दुधानी (वय ४०, रा. अंबरनाथ), पापीसिंग उर्फ कृष्णसिंग साहेबसिंग टाक (वय १८, रा. परभणी), मंगलसिंग मायासिंग दुधानी (वय ५८, रा. झरी, जि. परभणी). ओतूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(४), ३१०(५) तसेच आर्म्स ॲक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Punegraminpolice
पोलिसांची धाडसी कामगिरी.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. प्रमोद क्षीरसागर, जुन्नरचे पो.नि. दत्तात्रय गुंड, सपोनि महादेव शेलार, सपोनि ज्ञानेश्वर बाजगिरे, पोसई युवराज जाधव आणि जुन्नर आर.सी.पी. पथक यांनी जिगरबाज कामगिरी केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील करत आहेत. Punegraminpolice
२० गंभीर गुन्हे, ५० हून अधिक गुन्ह्यांची पार्श्वभूमी.
पोलीस कोठडीत आरोपींची सखोल चौकशी केली असता, ही टोळी आंतरराज्यीय पातळीवर सक्रिय असल्याची धक्कादायक बाब समोर आली. महाराष्ट्र, तेलंगणा व इतर राज्यासह एकूण २० गंभीर गुन्हे उघड झाले आहेत. ज्यामध्ये १२ दरोडे, १ दरोड्याचा प्रयत्न, २ जबरी चोऱ्या, १२ घरफोड्या, २ वाहन चोऱ्या आणि मालमत्तेचे नुकसान अशा ५० पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. Punegraminpolice
