शिवसेनेचा वर्धापनदिन गाजवणारा नितीन चंदनशिवे आहे तरी कोण?

चाकण प्रतिनिधी दि.२२ –

नुकताच शिवसेनेचा वर्धापनदिन मुंबई येथे साजरा करण्यात आला. एकीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मधील खासदारांसाठी शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात होते. तर एकीकडे वर्धापनदिनानिम्मित कधी विनोद करून खळखळून हसवणारा, कधी नेत्यांना हळूच चिमटे काढणारा तर कधी भावनिक करून डोळ्यातून चटकन पाणी आणणारा व्यक्ती भाषण गाजवत होता. आपल्या कवितेतून समाजाचे जळीत व खरमरीत वास्तव मांडणारा व्यक्ती होता तरी कोण? असा प्रश्न पडून संपूर्ण महाराष्ट्रात व राजकीय वर्तुळात त्याच व्यक्तीची जास्त चर्चा होती. तर तो व्यक्ती आहे प्रसिद्ध कवी दंगलकार नितीन चंदनशिवे.

दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांची पार्श्वभूमी.

कवी चंदनशिवे यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ हे आहे. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील हे गवंडी काम करायचे. त्यांना तीन बहीण होत. प्रतिकूल परिस्थितीमुळे उपजीविकेसाठी पुणे येथे स्थायिक व्हावे लागले. पुण्यात आल्यावर नोकरीच्या शोधात वणवण फिरावे लागले. पण नोकरी काही मिळाली नाही. म्हणून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. रात्री झोपायची सोय नसल्यामुळे वॉचमनची नोकरी करावी लागली. ती करावी लागली कारण, झोपायला मिळायचं आणि पगारही मिळायचा. वॉचमनच्या कामाला फारस काही कष्ट नसल्याने छंद म्हणून पुस्तकं वाचायला सुरवात केली. त्यामुळे मेंदूला चांगलीच चालना मिळाली. यातूनच कविता लिहण्याला प्रोत्साहन मिळाले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आदर्श.

मरेपर्यंत मी अभिमानाने सांगत राहीन की, माझ्या लिखाणाची प्रेरणा हे अण्णाभाऊ साठे आहेत आणि लिहिण्याची ताकद भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळाली आहे. फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या समाज प्रबोधनातून, समाजाच्या विकासातून आम्ही श्वास घेतोय, घास खातोय. माझ्या घराचं नाव संविधान आहे. बाबासाहेबांनी आम्हाला उभं केलं, नाही तर आजही आम्ही ढुंगणाला खराटा आणि गळ्यात मडके लावून फिरलो असतो, असेही कवी चंदनशिवे सांगतात.

“दंगलकार’ नाव पडण्यामागचा इतिहास.

‘’परांड्याला एक कवी संमेलन होतं. श्रोते म्हणून हिंदू व मुस्लिम असे दोन्ही एकत्र बसले होते. नेमकं त्याच काळात आमच्या सांगलीमध्ये दंगल घडली होती. नेमके हिंदू-मुस्लिम ह्या विषयावर ‘दंगल’ ही कविता केली. कविता सादर केल्यावर रसिकांनी माझ्यावर अक्षरश: पैशांची उधळण केली. ते पैसे गोळा केले तेव्हा आकडा होता ३७ हजार रुपये. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी छापून आली कि, “दंगलकारांनी जिंकली परांडाकरांची मने” खरं म्हणजे त्या बातमीत छापण्यामध्ये चूक झाली होती. पत्रकाराला लिहायचं होतं “दंगल कवितेने जिंकली परांडाकरांची मने”. मात्र छापून आलं दंगलकारांनी जिंकली परांडाकरांची मने. मग हीच उपाधी नावापुढे लागली.

“आमचा कांबळे’’ हि कविता तुफान गाजली.

आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला नुसताच कन्हला आ… करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेने पाटीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला… पण कांबळे हुशार, कधीच नाही रडला. नुसताच कन्हला आ… करून. 

कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं गार्डनमध्ये बसल्यावर विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, “वेडे मी माणूस, माणूस माझी जात. प्रेमात कसली आली जात?” मग ‘माणूस माझी जात’ असं म्हणणारी एकच जमात पुरोगामी वाल्यांची. मग तिनंही कांबळेला असा तुडवला, असा तुडवला… पण कांबळे बी हुशार. कधीच नाही रडला, नुसताच कन्हला आ… करून. 

कांबळेच लग्न ठरलं, घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण पूजा घाला, कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणाली, मित्र म्हणाले जागरण गोंधळ, बोकाड तरी काप. कांबळे म्हणला पटतच नाही गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच कांबळेला दार लावून असा तुडवला… पण कांबळे हुशार. कधीच नाही रडला नुसताच कन्हला आ… करून. 

मग कांबळे चळवळीत आला. या पुरोगामी संघटना वगैरे या सगळ्याचे गट तट पडलेले बघितले. राजकीय पक्षांचे, संघटनांचे. कांबळे सर्वांना म्हणाला सगळ्यांनी एकत्रित या, विचार जिवंत ठेवा, चळवळ जिवंत ठेवा. दिवसभर ओरडत राहिला मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला. मग याला कळले तुडवायला एकत्रित आले म्हणून. पण कांबळे कधीच नाही रडला. नुसताच कन्हला आ… करून. 

परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं की, “डॅडा फुले-शाहू-आंबेडकर कोण? हे संविधान काय भानगड आणि शिवाजी महाराज खरच जन्माला आले होते का?” डॅडा आता मात्र कांबळेवर चिडला. कारण गावभर पेरत राहिला आणि घरातच काही उगवलं नाही. म्हणून त्याने मुलालाच असा तुडवला… पण चिरंजीव कांबळे बी हुशार. तो पण कधीच नाही रडला, नुसताच कन्हला आ… करून.

आता कांबळे वेडा झालाय. त्याला व्यवस्थेने वेड ठरवलंय. कांबळेला वेड्यांच्या दवाखान्यात दाखल केले आणि कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देतोय. कांबळे वेड्यासारखं ‘सर्व धर्म समभाव’ म्हणतोय. कांबळे वेड्यासारखं ‘भारतीय’ म्हणून ओरडतोय. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही, कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवतायत. पण कांबळे कधीच नाही रडला. नुसताच कन्हातोय आ… करून. 

Leave a Comment