Homeक्राईमफिल्मी स्टाईलने पाठलाग करून साखळीचोरास अटक.

फिल्मी स्टाईलने पाठलाग करून साखळीचोरास अटक.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांसकडून सन्मान.

चाकण प्रतिनिधी दि. १४ :-

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-१ ने एका सराईत साखळीचोराला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक केली. तब्बल पाच चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून सुमारे १५ लाख रुपये किंमतीचे ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.

३ जून २०२६ रोजी सकाळी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे निलख परिसरात एका पादचाऱ्याच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून नेली होती. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट- १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.

तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. आरोपी पुणे-बंगळुरू महामार्गाचा वापर करत असल्याचे तसेच बाणेर परिसरात वारंवार फिरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी बाणेर परिसरात दोन ते तीन दिवस सापळा रचला.

अखेर ७ जून रोजी रात्री आरोपी पुन्हा चेन स्नॅचिंगच्या उद्देशाने बाणेर परिसरात आल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. संशय आल्याने आरोपी दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी धाडसी पाठलाग करून त्याला फिल्मी स्टाईलने ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित गोविंद इंगळे (वय ३१ वर्षे) असे आहे. आरोपी सध्या मामुर्डी, ता. हवेली येथे राहत आहे. मूळचा राहणार श्रीपत पिंपरी, ता. बार्शी, जि. सोलापूर येथील रहिवासी आहे.

पोलीस तपासात आरोपी हा रेकॉर्डवरील साखळीचोर असून तो एकटाच गुन्हे करत असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून खालील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. 

१. सांगवी पोलीस ठाणे – गु.र.नं. – २३७/२०२६

२. दापोडी पोलीस ठाणे – गु.र.नं. – ४९/२०२६

३. तळेगाव पोलीस ठाणे – गु.र.नं.-१७०/२०२६

४. देहूरोड पोलीस ठाणे – गु.र.नं. – १३७/२०२६

५. भारती विद्यापीठ पोलीस ठाणे – गु.र.नं.- ३२१/२०२६ 

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments