#LPGGas : चाकणमध्ये पोलिसांचे गॅस माफियावर धाडसत्र.

पोलिसांच्या धाडीत २५१ सिलेंडर जप्त, ९.७१ लाखांचा मुद्देमाल ताब्यात.

चाकण प्रतिनिधी दि. ५ –

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चाकण (ता.खेड) परिसरात सुरू असलेल्या अवैध गॅस रीफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल २५१ गॅस सिलिंडरसह ९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रकाश सिद्धन्ना जवलगी (वय ३२, रा. चाकण, ता. खेड) आणि तुषार प्रफुल्ल वासळे (वय ३६, रा. एकतानगर, चाकण) अशी अटक आरोपींची नावे आहेत.  एजन्सी मालक शुभम प्रविण परदेशी हा फरार आहे. 

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली की, चाकण मार्केट यार्डजवळील बालाजी गॅस एजन्सी परिसरात भरलेल्या गॅस सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरला जात आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी आरोपी कोणतीही सुरक्षितता न बाळगता धोकादायकरीत्या भरलेल्या सिलिंडरमधून इतर सिलिंडरमध्ये गॅस भरत होते. तसेच गॅस सिलिंडरचा काळाबाजार करण्याच्या तयारीत आढळले. आरोपींकडून २५१ गॅस सिलिंडर, वजन काटा, नोजल आदी गॅस रिफिलिंग साहित्य तसेच एक महिंद्रा बोलेरो टेम्पोसह एकूण ९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक रावसाहेब मोटे, गोरक्षनाथ बालवडकर, महेश खांडे व त्यांच्या पथकाने कारवाई केली.

Leave a Comment