खराबवाडी व महाळुंगे इंगळे ग्रामस्थांची एकच मागणी.
चाकण दि.१३ – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिम्मित पिंपरी चिंचवड पोलिस मुख्यालय, निगडी येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या शांतता कमिटी सदस्य व जयंती मंडळांचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

या बैठकी दरम्यान शांतता कमिटी सदस्य व माजी उपसरपंच प्रकाश खराबी यांनी पोलीस आयुक्तांसमोर प्रश्न मांडून कैफियत सांगितली की, खराबवाडी व महाळुंगे इंगळे ही दोन गावे दक्षिण व उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत विभागली आहेत. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाची दक्षिण व उत्तर बाजू अशी हद्द ठरविल्याने गावे विभागली गेली आहेत. नेमका याच गावांमधून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने पोलिस विभागाशी संबंधित कामे करताना स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनास ही कामे करताना तांत्रिक व भौगोलिक परिस्थितींचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे गावातील सर्व नागरिकांची एकच मागणी आहे की, प्रशासकीय कामकाज व गावविकासाच्या दृष्टीने ही दोन्ही गावे दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनलाच जोडण्यात यावीत.
“पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सूचना केली आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनंतर दोन्ही गावांचा एकत्रित सर्व्हे करून अहवाल सादर करण्यात यावा.* श्वेता खेडकर,पोलीस उपायुक्त,पिंपरी चिंचवड परिमंडळ चार.„
“महाळुंगे गावातील नागरिकांसाठी ही एक खूप मोठी शोकांतिका आहे की, गावातच पोलिस स्टेशन असून सुद्धा ही आम्हाला पोलिस स्टेशनशी संबंधित कामे करण्यासाठी सावरदरी येथे जावे लागत आहे.
* चंद्रकांत दादा इंगवले, माजी सभापती, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती.

“चाकण औद्योगिक वसाहतीचा वाढलेला विस्तार आणि गुन्ह्यांचा वाढलेला चढता आलेख पाहता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत असणाऱ्या महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनची विभागणी करण्यात आली. महाळुंगे इंगळे व सावरदरी (ता.खेड) येथे अनुक्रमे दक्षिण महाळुंगे आणि उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याची डिसेंबर २०२५ मध्ये नव्याने निर्मिती करण्यात आली होती.”