चाकण प्रतिनिधी दि. १९ –
भावी पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसह मावळातील लोहगड किल्ल्यावर गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा फोटो काढताना पाय घसरून खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव केतन विशाल अग्रवाल (वय २४ वर्ष, रा.लोढा बेलमोंडो सोसायटी, गहुंजे, ता.मावळ जि.पुणे) आहे. मयत तरुण हा प्रसिद्ध उद्योगपती यांचा मुलगा असल्याने उद्योग क्षेत्रामधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मयत केतन हा आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रपरिवारासह लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेला होता. किल्ल्यावर भटकंती करत असताना ओलसर आणि निसरड्या वाटेवरून जात असताना त्याचा तोल गेला. ३५० फूट खोल दरीत कोसळून त्याचा दुर्दैवी अंत झाला.
तीन तासांची अथक शोधमोहीम.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथक आणि मावळ वन्यजीव पथकाला कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच दोन्ही पथके घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस व स्थानिकांच्या मदतीने तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर केतनचा मृतदेह लोहगड परिसरातील घनदाट झाडीतून बाहेर काढला. आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तरुणाला मृत घोषित केले.
शाही विवाह सोहळ्यापूर्वीच काळाचा घाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये केतनचे लग्न होते. दोन्ही परिवारांकडून लग्नाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती. लग्नासाठी उदयपूर, राजस्थान येथे १७ कोटी रुपये खर्चून एक आलिशान महाल बुक केला होता. तसेच लग्नास्थळी जाण्यासाठी दोन खाजगी विमानांचे बुकिंगदेखील करण्यात आले होते. पण शाही विवाह सोहळा होण्यापूर्वीच दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
