Chakan News महिलांमध्ये उन्हाळी पदार्थ बनवण्याची लगबग.

शेवया, कुरडया, पापड्या बनवण्यात महिला मग्न

चाकण दि.३१ : चाकण एमआयडीसी परिसरातातील गावांमध्ये महिलांकडून महाराष्ट्र खाद्यसंस्कृतीचा वारसा लाभलेल्या उन्हाळी म्हणजेच वाळवण पदार्थ बनवण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

    वाढत्या औद्योगिकीकरणामुळे गावे ही आधुनिक जीवनशैली असणाऱ्या शहरीकरणाच्या नगरीकडे झुकू लागली आहेत. पण आजही गावपण जपणाऱ्या हौशी महिला अजूनही जुन्या व पारंपारिक उन्हाळी पदार्थ बनवण्यामध्ये रस दाखवत आहे. या उन्हाळी पदार्थांमध्ये तांदूळ, साबुदाणा, बटाटा, उडीद यांचे पापड, तांदूळ किंवा गव्हाच्या कुरडया, विविध डाळींपासून बनणारे सांडगे, गव्हाच्या शेवया व चकल्या, बटाट्याचे वेफर्स तसेच कैरी, लिंबू, मिरचीचे चटकदार लोणचे असे वर्षभर टिकणारे पौष्टिक पदार्थ बनवले जातात. यात्रा तसेच सणासुदीच्या दिवशी जेवणासोबत हे पदार्थ खाताना जेवणाचा स्वाद वाढवतात. 

    उन्हाळा म्हटलं की लग्नसराईचा हंगाम असतो. लग्नामध्ये रुखवत मांडण्याची परंपरा जोपासली जाते. लग्नाच्या झालबरोबर रुखवतामध्ये ह्याच उन्हाळी पदार्थांची सजावट करण्यासाठी महिलांमध्ये उत्सुकता असते. वाढत्या शहरीकरण व सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये हे पदार्थ बनवण्याची कला आजही काही हौशी महिला जोपासत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Leave a Comment